आपल्याकडे धार्मिक पर्यटन मोठय़ा प्रमाणात केले जात असले तरी विशिष्ट देवळांत जाऊन हारफुले वाहणे, मूर्तीसमोर डोके टेकवणे या गोष्टींनाच जास्त प्राधान्य असते. वास्तविक आपल्याकडे असलेली प्राचीन मंदिरे ही त्या त्या काळात विशिष्ट हेतूने बांधली गेलेली आहेत. त्यांच्यावर कोरलेली विविध प्रतीके, मूर्ती त्या विशिष्ट काळावर प्रकाश टाकत असतात, त्या दृष्टीने मंदिर पाहायला हवे.
आपापल्या गावात किंवा परिसरात खूप सुंदर अगदी शिल्पसमृद्ध मंदिर असते. अनेकदा आपण तिथे जात असतो, पण तिथे काय पाहायचे आणि कशासाठी पाहायचं हे माहितीच नसते. वास्तविक मंदिरस्थापत्य आणि मूर्तिशास्त्र हे आपल्याकडे खूप प्रगत अवस्थेला पोहोचलं होतं. कुठलीही मूर्ती किंवा कोणतेही मंदिर बांधण्यामागे काही एक उद्देश असतो, एखादे तत्त्वज्ञान असते. ते समजून घेतले की, मंदिर पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या उत्साहाने पाहता येते. महाराष्ट्रात यादव आणि शिलाहार राजवटींच्या काळात मंदिरस्थापत्य भरभराटीला आलं होतं. शुष्क सांधी म्हणजे दोन दगडांमध्ये चुना, सिमेंटसारखे कोणतेही जोडणारे मिश्रण न वापरता निव्वळ दगडी बांधलेली मंदिरे. लोक याला सरधोपटपणे हेमाडपंथी मंदिरे असा चुकीचा शब्द वापरून मोकळे होतो. यादव राजांचा प्रधान हेमाद्री याने ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला. त्यात मंदिरबांधणीसंबंधीचे काही निर्देश केलेले आढळतात; पण या हेमाद्रीच्या आधीपासून आपल्याला ही शुष्कसांधी शैलीची मंदिरे आढळतात. त्यामुळे केवळ हेमाद्रीच्या या ग्रंथातील या उल्लेखावरून या अशा मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे म्हणण्याची चुकीची पद्धत रुढ झाली. ती वास्तविक शुष्कसांधी शैलीची मंदिरे आहेत.
मंदिर, त्यावरील मूर्ती, मंदिरात असलेल्या विविध गोष्टी या काही विचार करून निर्मिलेल्या असतात. इथे असलेली अनेक प्रतीके, चिन्हे, शिल्पे आपल्याला सतत मार्गदर्शन करीत असतात. मंदिर हे केवळ देवाचे निवासस्थान नसून ती एक सामाजिक संस्था आहे. इथे अनेक लोकांचा सतत वावर होत असल्यामुळे त्यांच्या शिकवणुकीसाठी, त्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी, तत्त्वज्ञान खूप सोप्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात रुजवण्यासाठी मंदिरांची, त्यावरील शिल्पांची आणि इतर गोष्टींची निर्मिती झाली असे म्हणता येईल. मुळात एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे मंदिराचे प्रथम बाहय़ दर्शन घ्यावे असे सांगितलेले आहे. आधी बाहेरून प्रदक्षिणा घालावी आणि नंतर मंदिरात प्रवेश करावा. मंदिरांवरील शिल्पांची रचनासुद्धा तशीच केलेली आहे. विविध प्रतीके जी मंदिरांवर कोरलेली दिसतात ती माणसाच्या आयुष्यातील विविध प्रसंग, गोष्टी यांची आठवण करून देणारी असतात. आपल्या मनातील नाना विकार हे सुरसुंदरींच्या द्वारे दाखवलेले असतात. विविध कामशिल्पे मंदिराच्या बाहय़ांगावर शिल्पित केलेली असतात. या सर्व गोष्टी मानवी जीवनाच्या अविभाज्य घटक आहेत, परंतु त्या बाहेर ठेवून मग निर्मल मनाने भगवंताचे दर्शन घ्यायचे असते. आपल्याकडे होते उलटेच.
मंदिराच्या प्रांगणामध्ये असलेल्या दीपमाळा काही विशिष्ट उद्देशाने बांधल्या गेल्या असे म्हणता येईल. तज्ज्ञांच्या मते दीपमाळा हे मराठा स्थापत्याचे खास वैशिष्टय़ आहे. त्याआधीच्या यादवकाळातील मंदिरात या दीपमाळा पाहायला मिळत नाहीत. मंदिराच्या प्रांगणातील दीपमाळा परिसराची शोभा वाढवतात. काही आडवाटेवरच्या मंदिरांसमोरसुद्धा अत्यंत सुंदर आणि कलात्मक दीपमाळा पाहायला मिळतात. मुख्यत्वे शंकराच्या मंदिरात असलेल्या दीपमाळा या त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी दिव्यांनी उजळलेल्या दिसतात. यालाच कोकणात टिपर पाजळणे असे म्हटले जाते. पुण्याच्या जवळ असलेल्या चास या गावची दीपमाळ अशीच भव्य, देखणी आणि आगळीवेगळी आहे. अशीच एक भव्य दीपमाळ शिखर िशगणापूर इथे असलेल्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पाहायला मिळतात.
काहीशी निराळी अशी एक दीपमाळ आहे ती नगर जिल्ह्य़ातल्या कर्जत तालुक्यातील राशीन या गावातल्या भवानी/जगदंबा मंदिरातली. इथे अत्यंत डौलदार अशा दोन दीपमाळा आहेत. यांचे वैशिष्टय़ म्हणजे या चक्क हालतात. त्यांचे बांधकाम खाली दगडाचे आणि वर विटांचे आहे. वर जाण्यासाठी बाहेरून आणि आतून जिने केलेले आहेत. वर गेल्यावर एक दांडा आहे तो धरून हलवला की दीपमाळ हलते. हा चमत्कार आश्चर्यकारक नक्कीच आहे. बीड जिल्ह्य़ातील रेणापूर, शिरूरजवळील कर्डे इथेही अशाच डोलणाऱ्या दीपमाळा आहेत. कोकणातल्या राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे या गावी असलेल्या भार्गवराम मंदिरातील दीपमाळ आधी चौकोनी मग वरती काहीशी गोल अशा पद्धतीची आहे. पुण्याजवळच्या पांडेश्वर या मंदिरासमोर असलेली दीपमाळ ही विटांची बांधलेली आहे. आतून पोकळ असलेल्या या दीपमाळेमधून वरती जाण्यासाठी जिना आहे. तिथेच जवळ असलेल्या लोणी भापकर या गावी असलेल्या भरवनाथ मंदिरातील दीपमाळा अशाच उंच आणि अत्यंत देखण्या अशा आहेत. काही दीपमाळांमध्ये खोबणी करून त्यामध्ये दिवे ठेवायची व्यवस्था केलेली असते तर काही दीपमाळांना पणत्या किंवा दिवे ठेवण्यासाठी काही प्रोजेक्शन्स केलेली आढळतात.
या दीपमाळेप्रमाणेच गरुडस्तंभ आणि नंदीस्तंभ कर्नाटकातील मंदिरांमध्ये आवर्जून पाहायला मिळतात. विष्णू मंदिराच्या प्रांगणात उंच असा खांब असून त्यावर एक छोटीशी घुमटी बांधलेली असते. त्या घुमटीमध्ये हात जोडलेल्या स्थितीमधील गरुडाचे शिल्प पाहायला मिळते. अगदी तशाच स्वरूपात शिवमंदिराच्या प्रांगणात त्या घुमटीमध्ये बसलेला नंदी पाहायला मिळतो. हे गरुडस्तंभ आणि नंदीस्तंभ मंदिराच्या प्रांगणात असतात. बरेच वेळा त्या खांबांवर मोठय़ा प्रमाणात नक्षीकाम केलेले आढळते. उत्तर कर्नाटकातल्या शिरसी, शिमोगा आणि आसपासच्या बळ्ळीगावी, बनवासी, बंदलिके, कोटीपुरा, केळदी या ठिकाणी असलेल्या मंदिरांमधील हे उंचच्या उंच गरुड किंवा नंदीस्तंभ पाहण्यासारखे आहेत. बेलूरच्या चेन्नकेशव मंदिरातील गरुडस्तंभ केवळ देखणा आणि आवर्जून पाहण्यासारखा आहे.
मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाला असलेल्या चौकटींना द्वारशाखा म्हणतात. अतिशय कलाकुसरयुक्त अशा या सजवलेल्या असतात. त्यावर पाने, फुले, नक्षीकाम, व्याल (काल्पनिक प्राणी), वादक अशांची शिल्पे कोरलेली असतात. मंदिराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या द्वारशाखांच्या तळाशी सेवक, सेविका, कधी कुबेर अशा काही प्रतिमा कोरलेल्या पाहायला मिळतात. द्वारशाखा आणि उंबरठा यांच्या समोरच बाहेरच्या बाजूला सुंदर नक्षी केलेली दिसते तिचे नाव चंद्रपान.
मुख्यत्वे शंकराच्या मंदिरात, गर्भगृहाच्या उंबरठय़ावर एक राक्षसाचे तोंड कोरलेले असते किंवा चित्रित केलेले असते. त्याला कीíतमुख असे म्हणतात. याबद्दलची एक कथा पुराणामध्ये सापडते. असे सांगितले जाते की, जालंधर नावाचा एक राक्षस होता. त्याला प्रचंड भूक लागायची. कितीही खाल्ले तरी त्याची भूक कधी शमायची नाही. त्याने शिवाची आराधना केली आणि यापासून मुक्ती देण्याची प्रार्थना केली. शिवाने त्याला सांगितले की तू स्वत:ला पायापासून खायला सुरुवात कर. शिवावर अपार भक्ती असल्याने त्याने ताबडतोब हा आदेश मान्य करून स्वत:ला पायापासून खाण्यास सुरुवात केली. शेवट फक्त तोंड राहिले तरीही त्याची भूक काही संपायची चिन्ह नाहीत. शेवटी शिवाने त्याला सांगितले की तू माझ्या मंदिराच्या उंबरठय़ावर बस. माझे भक्त तुझ्यावर पाय देऊन आतमध्ये येतील तेव्हा तू त्यांची पापे खा. तुला आयुष्यात कधीही कमी पडणार नाही!! आपण शंकराच्या मंदिरात गेल्यावर आपली पापे नष्ट करायची देवाचीच ही कल्पना. त्या जालंधर राक्षसाचे तोंड पुढे कीíतमुख म्हणून प्रसिद्ध झाले. देवावर असलेल्या अनन्यसाधारण भक्तीचे ते एक प्रतीक झाले. पुढे कीíतमुख हे एक डेकोरेटिव्ह मोटिफ म्हणून मंदिर स्थापत्यामध्ये वापरले जाऊ लागले. मंदिराच्या बाह्य़ांगावर जसे गजथर, अश्वथर असतात तसेच कीíतमुखथरसुद्धा दिसू लागले. दक्षिणेकडे होयसळ राजवटीमध्ये बांधल्या गेलेल्या बेलू, हळेबिडू इथल्या मंदिरांवर हा कीर्तीमुखाचा थर प्रकर्षांने पाहायला मिळतो. अनेक मंदिरांच्या छतावरसुद्धा कोनामध्ये ही कीíतमुखे कोरलेली पाहायला मिळतात.
मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर मुख्य देवतेची मूर्ती गर्भगृहामध्ये बसवलेली असते. अर्थातच इथे अंधार असला पाहिजे. फक्त तेवणारी एक समई आणि त्या गूढ प्रकाशामध्ये साधला जाणारा स्वत:शी संवाद आणि त्यातून मिळणाऱ्या ज्ञानामुळे होत जाणारी स्वत:ची ओळख हा त्याचा गाभा असतो.
या गर्भगृहाच्या दरवाजावर एक छोटी चौकट असते आणि त्यात एक देवतेची मूर्ती स्थापित केलेली दिसते. त्या मूर्तीला म्हणायचे ललाटिबब. मुख्य गाभाऱ्यात कोणती देवता आहे, किंवा ते मंदिर हे कोणत्या देवतेचे आहे हे सांगणारे ठिकाण म्हणजे हे ललाटिबब. एखादे मंदिर हे कोणत्या संप्रदायाला समíपत केलेले आहे, ते शैव, वैष्णव, शक्ती अशा कोणत्या संप्रदायापकी असेल तर त्या संप्रदायाच्या देवतेची एक छोटी प्रतिमा या ललाटावर कोरलेली आढळते. मंदिर शिवाचे असेल तर तिथे गणपती, शिव, भरव अशांच्या मूर्ती आढळतात. ते वैष्णव असेल तर तिथे विष्णूची आसन प्रतिमा किंवा शेषशायी विष्णूची प्रतिमा पाहायला मिळते. ते मंदिर जर देवीचे असेल तर त्या ठिकाणी देवीप्रतिमा पाहायला मिळते. मराठवाडय़ातील परभणीच्या जवळ असलेल्या जाम या गावी एक लक्ष्मीचे मंदिर आहे. या मंदिरावरील ललाटिबब फार महत्त्वाचे आहे. या ठिकाणी लक्ष्मी-विष्णूची प्रतिमा कोरलेली असून लक्ष्मीची मूर्ती मोठी आहे तर विष्णूची तिच्यापेक्षा लहान. आणि दुसरे वैशिष्टय़ म्हणजे लक्ष्मीच्या मांडीवर विष्णू बसलेला दाखवलेला आहे. इतका बारीक विचार करून केलेले ललाटिबबाचे हे अंकन निश्चितच दुर्मीळ आहे.
ललाटिबब हे अनेकदा मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करण्यासाठी असलेल्या दरवाज्यावरसुद्धा पाहायला मिळते. काही वेळेला त्या ठिकाणी काही बौद्ध किंवा जैन प्रतिमा पाहायला मिळतात. रांजणगाव गणपतीच्या जवळ असलेल्या िपपरी दुमाला या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करण्यासाठी तीन बाजूंनी दरवाजे आहेत. पकी एका दरवाज्याच्या ललाटबिंबावर जैन र्तीथकरांची प्रतिमा कोरलेली दिसते. ललाटिबबदेखील प्रकाशवाटांचेच काम करते.
मंदिरात गेल्यावर अगदी प्रत्येक ठिकाणी दिसणारी गोष्ट म्हणजे घंटा. आपण घंटा वाजवतो तेव्हा आपण स्वत:चे लक्ष एकाग्र करून देवाकडे वळवतो. आपल्या मनामध्ये चालू असलेले अनेक विचार बंद करून आपले चित्त देवाच्या स्मरणात, देवाच्या पायाशी स्थिर व्हावे यासाठी घंटेचे प्रयोजन केलेले आहे. आपण घंटा वाजवतो म्हणजे स्वत: जागे असल्याची खात्री करून घेतो. आपली सद्सदविवेकबुद्धी जागृत आहे याची आपली आपणच खात्री करून घेतो आणि मग देवाच्या दर्शनाला जातो. काही मंदिरांमध्ये पोर्तुगीज घंटासुद्धा पाहायला मिळतात. चिमाजीअप्पांनी वसईवर मिळवलेल्या विजयाची ती स्मरणचिन्हे आहेत. थेऊर, भीमाशंकर इथल्या मंदिरामध्ये तर या घंटा पाहायला मिळतातच परंतु देवाचे गोठणे इथले भार्गवराम मंदिर, मुळशीजवळच्या पळसे इथले शिवमंदिर, लोणीभापकरचे भरव मंदिर अशा अनेक मंदिरांवर त्या पाहायला मिळतात. त्यांच्यावर रोमन लिपीमध्ये मजकूर कोरलेला असतो आणि त्या घंटा टांगायच्या ठिकाणी एक विशिष्ट पद्धतीची जडणघडण आढळते.
घंटेप्रमाणेच सभागृहात असलेल्या कासवाच्या प्रतिमेची दखल घ्यावी लागेल. कासव हे कणखर, चिवट भक्तीचे प्रतीक म्हणूनच मंदिरामध्ये दाखवलेले असते. कासवाची पाठ टणक असते. त्याला चार पाय, एक डोके व एक शेपूट असे सहा अवयव असतात. आपल्या मनामध्ये असलेल्या षड्रिपूंचे प्रतिनिधित्व हे कासव करत असते. कुठलेही आक्रमण झाले की कासव आपले हे सहा अवयव पोटात ओढून घेते आणि टणक पाठ फक्त वरती राहते त्याच प्रमाणे आपल्या मनामध्ये असलेले सहा रिपू आपण आतमध्ये घेऊन कासवाच्या पाठीसारखे टणक होऊन देवाच्या भेटीला गेले पाहिजे हे त्यामागचे प्रयोजन असते. तसेच कासव हे दीर्घायुषी असते. आपल्याला दीर्घायुष्य लाभो अथवा आपली ईश्वराप्रती असलेली भक्ती दीर्घकाल अशीच चिवट राहो हे जणू इथे सुचवायचे असते. मंदिरामध्ये कासव ही संकल्पना जवळजवळ इ.स.च्या नवव्या शतकानंतर दिसू लागते. त्याआधीच्या मंदिरांमध्ये कासव कुठे आढळत नाही.
मंदिरांवर दिसणारी आणि इतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत पूरक असलेली अजून एक गोष्ट म्हणजे शिलालेख. ते मंदिर कोणी बांधले, कोणी पसे पुरवले, कोणी देणगी दिली या आणि अशा असंख्य गोष्टी आपल्याला त्यातून सापडतात. काही वेळेला मंदिर पडून गेलेले असते परंतु तिथे शिलालेख सापडतात आणि त्यामुळे त्या भागाचा सारा इतिहास आपल्यासमोर उलगडला जातो. शिलालेखात ते मंदिर बांधल्याचे साल कोरलेले असते. कर्नाटक राज्यात असलेल्या बदामी जवळच्या ऐहोळे इथल्या मंदिरावर असलेला सम्राट पुलकेशीचा शिलालेख प्रसिद्ध आहे. त्या शिलालेखानुसार पुलकेशी राजाची वंशावळच अभ्यासता येते.
कर्जत तालुक्यातील राशीन गावी असलेल्या भवानीच्या मंदिरात मराठी आणि संस्कृत शिलालेख आहेत. पेशवाईमधील मुत्सद्दी अंताजी माणकेश्वर यांचे राशीन हे गाव. त्यांच्या नावाचा उल्लेख असलेला शिलालेख या मंदिरात पाहायला मिळतो. या मंदिरात एकूण पाच शिलालेख आहेत. असाच एक देवनागरी भाषेतला शिलालेख देवगड तालुक्यातील कोटकामते या गावी असलेल्या भगवतीच्या मंदिरात आढळतो. मराठी आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हे गाव भगवती देवीला इनाम म्हणून दिले होते. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हा एक शिलालेख कोरून घेतला आणि तो मंदिरावर बसवलेला आहे. त्यावरून जीर्णोद्धाराचे वर्ष आणि त्यासंबंधीची माहिती उजेडात येते. अनेक बौद्ध लेण्यांमध्ये असे शिलालेख कोरलेले आढळतात. कोण भक्ताने दिलेल्या दानातून, देणगीमधून हे लेणे कोरून घेतले आहे याचा उलगडा या शिलालेखांवरून होतो. सर्वात मोठा शिलालेख आपल्याला जुन्नरच्या जवळ असलेल्या नाणेघाटाच्या तोंडाशी कोरलेल्या लेणीमध्ये पाहायला मिळतो. सातवाहन साम्राज्याची राणी नागनिका हिने तो कोरला आहे. नाणेघाटाच्या तोंडाशी असलेल्या लेणीच्या तीनही िभतींवर ब्राह्मी लिपीमधील हा शिलालेख मुद्दाम जाऊन पाहण्यासारखा आहे. काय काय रहस्य दडलेली आहेत त्यात हे तिथे गेले की समजते. या लेखात सातवाहन घराण्यातील राजांची नावे, नागनिका राणीने केलेले विविध यज्ञ, त्या यज्ञाच्या वेळी कार्षांपण या चलनात दिलेली दाने या आणि अशा अनेक गोष्टींचा उल्लेख या शिलालेखातून होतो.
पुण्यामधील प्रसिद्ध पुरातत्वज्ञ कै. डॉ. शोभना गोखले यांनी आपले सारे आयुष्य या शिलालेखांच्या अभ्यासासाठी वेचले. त्यांनी हे शिलालेख वाचून त्यातून मिळणारी माहिती जगासमोर आणली. जागतिक स्तरावर भारताचे नाव त्यांनी उज्ज्वल केले. महाराष्ट्रात अनेक किल्ल्यांवरसुद्धा आपल्याला शिलालेख आढळतात. ते बरेचदा दरवाज्याच्या बाजूला असतात. रायगड किल्ल्यावर हिरोजी इंदुलकर यांनी केलेल्या कामांची जंत्री त्यांनीच एका शिलालेखावर कोरून ठेवलेली आहे. ती वाचून त्या काळात त्यांनी या किल्ल्याला राजधानीचे स्वरूप देण्यासाठी कोणत्या गोष्टींची निर्मिती केली हे वाचून थक्क व्हायला होते.
शिलालेखाप्रमाणेच अजून एका गोष्टीवरून इतिहासातील घटनांवर उजेड पडतो ते म्हणजे ताम्रपट. तांब्याच्या पत्र्यावर ठोकून किंवा कोरून काढलेला मजकूर हा अनेक ऐतिहासिक घटनांवर उजेड टाकतो. बरेच वेळा राजसत्तेकडून जेव्हा विविध दाने दिली जात होती तेव्हा ती ताम्रपट या स्वरूपात देत असत. ताम्रपट हे धातूचे पत्रे असल्यामुळे ते टिकाऊ होते आणि ती दाने वंशपरंपरागत दिलेली असल्यामुळे ती अनेक शतके टिकून राहणे अध्याहृत होते आणि म्हणूनच ती ताम्रपटाच्या स्वरुपात दिलेली असत. रत्नागिरी जिल्ह्य़ातल्या आडिवरे या महाकालीच्या गावाजवळच कशेळी नावाचे गाव आहे. गावात कनकादित्य असे सूर्यमंदिर आहे. या मंदिरात चार पत्रे असलेला एक सुंदर ताम्रपट पाहायला मिळतो. जाड पत्रा असलेला इ.स. ११९१ सालचा शिलाहार भोजराजाचा हा ताम्रपट म्हणजे त्या राजाने या मंदिराला दिलेले दानपत्र आहे. अनेक ताम्रपटांमुळे खूपच महत्त्वपूर्ण ऐतिहासिक बाबी उघडकीला आल्या आहेत.
अनेक बारीकसारीक गोष्टी आपल्याला मंदिर कसे पाहावे हे शिकवतात, आपल्या बुद्धीला चालना देतात, आपल्याला आश्चर्यचकित करून टाकतात. मंदिर स्थापत्यामध्ये असलेले बारकावे अभ्यासू लागलो की त्यामागची कलाकाराची दृष्टी, त्यामागचे तत्त्वज्ञान ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ समजून येते. मंदिराच्या बाहय़िभतींवर असणारी अप्सरांची शिल्पे ज्यांना सुरसुंदरी असे म्हटले जाते हे याचेच एक उदाहरण आहे. या अत्यंत आकर्षक आणि डौलदार असलेल्या अप्सरांची शिल्पे ही मानवाच्या मनातील विविध विकारांची प्रतीके आहेत. साखरेचे वेष्टन असलेली खरे तर ही कडू गोळी आहे. काम, मद, मत्सर हे आपल्या मनातील भाव हे त्या अप्सरांच्या रूपाने शिल्पित केलेले आढळतात. त्या कायम मंदिराच्या बाहय़ भागावरच असतात. अनेक लोकांकडून गरसमजुतीमधून एक चूक अशी होते की मंदिरात दर्शनाला गेल्यावर आधी देवाचे दर्शन घेऊन नंतर प्रदक्षिणा घातली जाते. परंतु बाहय़दर्शन प्रथम या न्यायाने या सर्व अप्सरा ज्या आपल्या मनातील विकारांचे प्रतिनिधित्व करतात त्यांचे दर्शन आधी हवे. हे सगळे विकार मानवाला आहेतच ते असेच बाहेर ठेवायचे. जसे आपण चपला-बूट बाहेर काढून नंतर मंदिरात जातो, त्याच न्यायाने हे विकारही बाहेर काढून ठेवून निर्मल मनाने भगवंताच्या दर्शनाला जावे, हा त्या मागचा उद्देश आहे. त्यासाठीच त्यांचे अंकन हे मंदिराच्या बाहय़ भागावर केलेले आढळते.
गर्भगृहात असलेल्या देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते. गाईचे तोंड शिल्पित केलेले असते आणि त्यातून ते जल बाहेर येते. गोमुखातून आलेले पवित्र जल असे त्याला मानले जाते. परंतु हे गोमुख इ.स.च्या तेराव्या शतकानंतर दिसू लागते. त्याआधी मकरप्रणाल अर्थात मगरीचे तोंड कोरलेले दिसते आणि ते पवित्र जल मगरीच्या तोंडातून बाहेर पडत असते. मगर हे गंगेचे वाहन आहे. त्याच्या तोंडातून येणारे जल ते गंगाजल हे सांगण्यासाठी, मगरीचे गंगेचे असेलेले नाते स्पष्ट करण्यासाठी मकरमुख कोरलेले दिसते. संगमेश्वरजवळ असलेल्या कर्णेश्वर मंदिरात, तसेच कोल्हापूर जिल्हय़ातल्या खिद्रापूर मंदिरात अशी अत्यंत देखणी मकरमुखं पाहायला मिळतात.
मराठवाडय़ातील अनेक मंदिरे ही या सुरसुंदरींसाठी प्रसिद्ध आहेत. पानगाव, निलंगा येथील मंदिरांवर तर अत्यंत देखण्या अशा या अप्सरा कोरलेल्या आढळतात. त्यांना विविध नावेसुद्धा दिलेली आहेत. डालमालिका, कर्पूरमंजरी, आलसा, दर्पणा, शुकसारिका, नूपुरपादिका, पत्रलेखिका, मेनका यांसारखी नावे त्यांना दिलेली आहेत. अत्यंत सुडौल आणि बांधेसूद असे त्यांचे अंकन केलेले आढळते. नगर जिल्हय़ातल्या अकोले तालुक्यातील टाहाकारी इथल्या मंदिरावरसुद्धा अत्यंत आकर्षक अशा या अप्सरा कोरलेल्या दिसतात. मनातील विकारांवर त्या भाष्य करतात आणि माणसाच्या आयुष्यातील त्यांचे अपरिहार्य असलेले स्थान त्या विदित करीत असतात.
मंदिर ही एक सामाजिक संस्था आहे. तिथे अनेक प्रकारचे लोक येत असतात, भेटत असतात, चर्चा करतात. प्राचीन काळापासून मंदिरांचा उपयोग हा केवळ देवाचे निवासस्थान या स्वरूपात न करता एक सामाजिक संदर्भ म्हणून केला जायचा. तिथे होणारे उत्सव, समारंभ, जत्रा-यात्रा यांचा उद्देश परिसरातील लोकांनी त्या निमित्ताने एकत्र यावे हाच होता. मंदिराच्या संदर्भात वर उल्लेखिलेल्या या सर्व गोष्टी येणाऱ्या भाविकाचे प्रबोधन व्हावे, त्याला काही तत्त्वज्ञान सांगावे, त्याच्या मनाच्या अवस्थांचे प्रातिनिधिक स्वरूप त्याच्या समोर उभे करावे या उद्देशाने केल्या गेल्या. याचाच अर्थ मंदिरात दर्शनाला आलेल्या भाविकाला वाट दाखवण्याचे, प्रकाश दाखवण्याचे काम ही सर्व प्रतीके वर्षांनुवर्षे करीत आली आहेत. अज्ञानाचा अंधकार नाहीसा व्हावा आणि ज्ञानाचा उजेड त्याच्या आयुष्यात पडावा यासाठी केलेला हा सारा खटाटोप होता असे समजते. मंदिरावर असलेली कोणतीही मूर्ती, प्रतिमा, चिन्हे ही केवळ उगाच केलेली नाहीत. त्यांच्यामागे काही तत्त्वज्ञान काही ठाम वैचारिक बठक नक्कीच आहे. या गोष्टींचा मागोवा घेताना तो विचार, ते तत्त्वज्ञान काही प्रमाणात जरी आपल्या मनात भिनले तरीसुद्धा देवाचिये द्वारी झालेली आपली वारी ही निश्चितच प्रकाशमय झाली असे म्हणता येईल. अशा आपल्या आसपास असलेल्या अनेक स्थळांना या निमित्ताने आपण भेट देऊन त्यावरील कलाकुसर, शिल्पकला पाहिली, ते निर्माण करण्यामागची कारणे समजून घेतली तर आपले पर्यटन अधिक समृद्ध होईल, अधिक संपन्न होईल यात शंकाच नाही.