Saturday 27 August 2016

bajirao peshwa part 3

बाळाजींच्या मृत्यूनंतर "पेशवेपदासाठी" दरबारी लोकांत अहमहिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले. त्याला २ कारणे होती - १)यादवकालीन राजकारणापासून ते ताराराणीपर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते. २)थोरला बाजीराव हा फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली.
बाजीराव शिपाई होता. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंबर,१७२३), धार (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपूर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (१७मे, इ.स. १७३९) या आणि अशाच ३६ मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा "सक्सेस रेट" "१००%" आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण "मैदानी लढाई" लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली. बर्नाड मॉन्टगोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटिश ’फील्डमार्शल’ने बाजीरावाची स्तुती पुढीलप्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. शनिवारवाड्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठिकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट किल्लाच बांधवून घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालून येणारे ’शिकारी कुत्रे’ खरेच स्वराज्याला घाबरू लागले.

No comments:

Post a Comment