२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. ही बातमी मिळताच माळव्याच्या सुभेदारीवर असलेल्या त्याचा मुलगा - आज्जमशहा त्वरेने अहमदनगरला आला. ईदच्या मुहूर्तावर १४ मार्च १७०७ रोजी त्याने स्वतःला बादशहा म्हणून जाहीर केले. व आपला भाऊ शहा आलमचा काटा काढायला तो उत्तरेत निघाला. याच वेळी झुल्फिकारखान व इतरांच्या सल्ल्याने त्याने ८ मे १७०७ रोजी शाहूंची सुटका केली. मात्र येसूबाईंना त्याने कैदेतच ठेवले. ऑगस्ट १७०७ मध्ये शाहू महाराष्ट्रात आले. ताराराणींनी सात वर्षे औरंगजेबाशी लढा देऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले होते, शाहूने गादीवर आपला हक्क सांगताच संघर्ष होणार हे अटळ झाले. शाहूने सुरुवातीला समजूतदारपणे घेतले मात्र ताराराणींनी लढाईची तयारी करताच शाहूंचा नाइलाज झाला. धनाजी जाधव व परशुराम त्रिंबक सैन्य घेऊन निघाले. शाहूंनी धनाजीस बोलणी करावयास बोलावून घेतले. धनाजी जाधवांच्या पदरी असलेल्या खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ आनि नारो राम यांनी शाहूंचा पक्ष बरोबर असून त्यांचा पक्ष घेण्याची गळ धनाजीरावांना घातली. धनाजी ससैन्य शाहूंच्या बाजूने गेले. परशुराम त्रिंबकाने याला विरोध केला मात्र अखेर खेड येथील लढाईत शाहूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. शाहूंनी धनाजीरावांना सेनापतीपद, नारो शंकरांना सचिवपद व बाळाजी विश्वनाथास मुतालिक म्हणून नेमले आणि सेनाकर्ते असा किताबही दिला.
अर्थातच स्वराज्याच्या २ गाद्या तयार झाल्या. ताराराणींच्या पक्षातले अनेक जण बाळाजीने केवळ स्वतःच्या शब्दावर शाहू महाराजांच्या पक्षात आणले. राज्यकारभार चालवताना तुटलेली माणसे त्यांनी परत जोडली. जर शाहूंचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी सहज झुंजू शकतील हे आंग्ऱ्यांना बाळाजीनेच पटवून त्यांना शाहूंच्या पक्षात आणले. त्यांनी सय्यदबंधूंबरोबर तह घडवून आणला, मग त्यांच्याच साहाय्याने दिल्लीच्या फर्रुखसियर बादशहाला पदच्युत करून रफिउद्दौरजात याला गादीवर बसवले. याच तहानुसार बाळाजींनी शाहूच्या पत्नींची सुटका करवून घेतली. मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उडू नये म्हणून बाळाजीने केलेली राजकारणे भल्याभल्यांची मती गुंग करणारी आहेत. आणि हे केवळ त्याने शब्दसामर्थ्यावर घडवून आणले होते हे महत्त्वाचे. १७०७पासून पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले. अर्थात तो त्या योग्यतेचा होताच, आणि ते पद त्याने सहजगत्या पेलले.
बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर पेशवेपद त्यांचे पुत्र बाजीरावाकडे आले.
No comments:
Post a Comment