परदेशी इतिहासकार पानिपतावरील मराठा पराक्रमाचे गोडवे गात असताना दुर्दैवाने काही भारतीय लेखक आणि इतिहासकार पानिपत हे मराठे आणि महाराष्ट्रावरील कलंक आणि अपयश असल्याचे मानतात. वास्तविक पाहता दिल्लीत मुसलमानी राजवट असताना शेकडो मैल दूर असलेल्या पुण्यावरून मराठा लष्कराला पानिपतावर जाण्याची मुळीच गरज नव्हती. खरे तर दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी मुघलांची हुजरेगिरी, गुलामगिरी करणारे, त्यांच्या बाजूने लढणारे तत्कालीन राजपूत, जाट, मुस्लिम संस्थानिक, राजेरजवाड्यांची होती. दिल्लीच्या इभ्रतीचे रक्षण करण्यासाठी आलेल्या मराठ्यांना मदत न करता बिळात लपून बसणाऱ्या वर उल्लेखित सर्वांसाठी पानिपत हे कलंक आहे. या भूमीचे अन्न खाल्लेला, तिच्यावर पोसला गेलेला रोहिलखंडचा नजीब खान, अवधचा नबाब शुजाउद्दोला यांनी मराठ्यांच्या राष्ट्रधर्माची बाजू न घेता आपल्या धर्माची तळी उचलून धरत देशाशी बेइमानी केली. त्यामुळे पानिपतचा कलंक हा मराठ्यांवर नव्हे, तर या सर्व बेइमानांवर आहे. पानिपतावर मराठे प्राणाची आहुती देत असताना महाराष्ट्र वगळता उर्वरित हिंदुस्थानातील तथाकथित ‘पराक्रमी’ राजे-महाराजे, संस्थानिक गंमत पाहत होते. धर्माने मुसलमान असलेल्या दिल्लीच्या बादशहाचे राज्य शाबूत ठेवण्यासाठी लाखभर मराठ्यांनी मैदानावर जिवाची जी होळी खेळली, त्याला देशाच्या इतिहासात तोड नाही.
अफगाणिस्तानचा शासक अहमदशहा अब्दाली, भारतातील बेइमान नजीबखान रोहिला आणि अवधचा नबाब शुजाउद्दोला यांनी हे युद्ध धर्मासाठी लढले. परंतु, मराठ्यांनी देशासाठी युद्ध केले. कारण, मराठ्यांचे लष्कर हे अठरापगड जातींचे होते. त्यात मराठा, ब्राह्मण, मुस्लिम, हबशी यांच्यासह महाराष्ट्रातील बारा बलुतेदार शिपाई सहभागी झाले होते. भगवा झेंड्याच्या रक्षणासाठी मुस्लिम असलेल्या इब्राहिम खान गारद्याने धर्मासाठी नव्हे, तर राष्ट्रकार्यासाठी प्राणाचे बलिदान दिले. सदाशिवराव भाऊने तर पानिपतावर अभिमन्यूप्रमाणे लढताना अतुलनीय पराक्रम गाजविला. त्यांच्या शौर्याला तोड नाही. अनेक सरदार त्यांना रणांगण सोडण्याचे सल्ले देत असताना भाऊने देशकार्यासाठी मरण पत्करणे पसंत केले.
No comments:
Post a Comment