छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत,माळवा,गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी राज्याच्या कोल्हापूर व सातारा अशा दोन स्वतंत्र छत्रपतींच्या गाद्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) निर्माण झाल्या. औरंगजेबाच्या अझमनामक मुलाने शाहूंची सुटका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले; मात्र चौथाई व सरदेशमुखीसाठी १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली. छत्रपती शाहू (कार. १७०८–४९) यांनी १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले. त्यांनी सातारा ही राजधानी केली. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्त केली. त्यांनी अनेक गुणी, कर्तृत्ववान व पराक्र मी माणसे निवडून राज्यविस्तार केला. या कामी त्यांना बाळाजी विश्वनाथ,पहिला बाजीराव व बाळाजी बाजीराव हे पेशवे आणि कान्होजी आंग्रे,रघूजी भोसले, दाभाडे, उदाजी चव्हाण यांसारखे कर्तबगार व निष्ठावान सरदार-सेवक लाभले.
No comments:
Post a Comment