सह्याद्रीच्या कुशीतले भीमाशंकर
एरवी एप्रिल-मे महिन्यातील ऊन आपला प्रकोप दाखवायला सुरवात करतं.. मात्र याच काळात सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भीमाशंकरचा परिसर धुक्यात हरवलेला पाहून निसर्गाच्या चमत्काराला आपण नमस्कार करतो... सर्वत्र हिरवाई... पक्षांचा किलबिलाट...अशा प्रसन्नचित्त वातावरणात आपण भीमाशंकरच्या चरणी नतमस्तक होतो...
भीमाशंकर.. बारा ज्योतिर्लिंगापेकी एक. . .डाकिन्या भीमाशंकर अशी पुराणात ओळख असलेल हे एक थंड हवेच ठिकाण. . .निसर्गप्रेमी, जंगलप्रेमी, गिर्यारोहक, पक्षीनिरीक्षक यांच्यासाठे हे नंदनवनच. तीर्थाटनाबरोबरच वन्यजीव व वनौषीधींचा अभ्यास याठिकाणी करायला मिळतो.
येथे येणारे भाविक मंदीराचा परिसर पाहूनच प्रसन्न होतात. हेमाडपंथी रचना असलेल्या या मंदीरात चांदीचे शिवलिंग आहे. याठिकाणी श्रावणात, महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भीमाशंकरची ओळख आता वनपर्यटनाचे ठिकाण म्हणूनही होऊ लागली आहे.
येथे येणारे भाविक मंदीराचा परिसर पाहूनच प्रसन्न होतात. हेमाडपंथी रचना असलेल्या या मंदीरात चांदीचे शिवलिंग आहे. याठिकाणी श्रावणात, महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भीमाशंकरची ओळख आता वनपर्यटनाचे ठिकाण म्हणूनही होऊ लागली आहे.
पुणे, ठाणे, रायगड या तीन जिल्ह्यांचा 125 चौरस किलोमीटर क्षेत्राचा हा परिसर.. या क्षेत्रात पसरलेल्या अभयारण्यात सांबर, चितळ, हरीण, भेकर, तरस, कोल्हे, रानडुकरे, उदमांजर, खवले मांजर, वानर, ससे या प्राण्यांचा वावर आहे. या जंगलात असलेल्या गावांतील लोकांची ये-जा करण्याची वाट याच जंगलातूनच जाते. रात्री-अपरात्री या वाटेनेच ते जातात-येतात पण इथली जनावरं त्यांच्या अंगावर आली नाहीत. त्यांच्या रहाण्याच्या जागा पायवाटेपासून बर्याच अंतरावर असल्यामुळे असेल कदाचित. मंदिराच्या पूर्वेला थोड्या अंतराने खाली गेलं की जंगलाची सुरुवात होते. दहा मिनिटांच्या अंतराने घनदाट जंगल सुरु होते. रानटी आंबे, जांभळ, करप (अंजन), मळवा, फनसाल, करंबो, शेंद्री, हिरडा, भेडा ही वृक्ष दाटीवाटीने उंचीसाठी स्पर्धा करतायत असा भास व्हावा एवढया उंचीचे वृक्ष. सूर्याच्या किरणांना जमिनीवर येण्यासाठी मज्जाव . . . त्यामुळे वातावरणात गारवा. जसजस आपण जंगलाच्या आतमध्ये जाऊ तसा गारवा वाढत जातो.
घनदाट अरण्यातून दोन कि.मी.च्या अंतरावर गुप्त भीमाशंकर आहे. त्या रस्त्यानी जाताना आपली नजर भिरभिरती ठेवल्यास बर्याच गोष्टींची माहिती होते. टिपनी ही वनस्पती मुका मार लागलेल्या ठिकाणी चोळून लावल्यास साकळलेले रक्त पूर्ववत होण्यास मदत होते. ही वनस्पती या ठिकाणी मुबलक प्रमाणात मिळते. आपण मसाले भाताला चवदार करण्यासाठी तमालपत्र टाकतो. ते देखील या ठिकाणी मुबलक प्रमाणात आढळते. येथील आदिवासी याचा उपयोग करतात. त्यांच्या जवळून जाताना त्या वासाची खात्री होते. हे सर्व निरिक्षण करता करता आपण पुढे गेलात की, एका दरीत पापमोचन तीर्थ दिसते जे भीमाशंकर मंदिराजवळील कुंडापासून जमिनीखालून वाहत या ठिकाणी भीमा नदेच्या रुपात प्रकट होते. त्या स्थळालाच 'गुप्तभीमा ' असे म्हटले जाते. भिमा जिथे उगम पावते तिथे दगडामध्ये छोटेसे शिवलिंग आहे. लहान झर्याच्या स्वरुपात वाहणारा प्रवाह पावसाळ्यात मोठा धबधबा होतो, तो या शिवलिंगावर पडून सतत अभिषेक करत असतो. चोहोबाजूंनी हिरव्या गर्द टेकड्यांनी अच्छादलेले हे ठिकाण सुंदर आहे. मनाला पुन्हा पुन्हा साद घालणारं हे ठिकाण पर्यटकांसाठी दुहेरी मेजवानी देणारं आहे. सह्याद्रीच्या अगदी शेवटच्या टोकावर वसलेलं हे स्थान भोवतालच्या जगाचं, किल्याचं, नद्यांच आणि अनेक पर्यटन स्थळांचं अनोखं, आल्हाददायक दर्शन घडवतं. त्याचा आस्वाद घ्या. मात्र हा आस्वाद घेताना येथील निसर्ग, पर्यावरणाला धक्का लागणार नाही, याची काळजीही घ्या आणि सुट्यांचा आनंद व्दिगुणीत करा.
No comments:
Post a Comment