Monday, 29 June 2015

लोणार सरोवर, जि.बुलढाणा


लोणार सरोवर, जि.बुलढाणा
लोणार सरोवर हे महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खार्‍या पाण्याचे एक जगप्रसिद्ध सरोवर आहे.याची निर्मिती एक उल्केमुळे झाली.
उल्कापातामुळे तयार झालेले हे सरोवर औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी उल्कापाताने तयार झालेल्या लोणार सरोवरामुळे बुलढाणा जिल्हा अनेकांना परिचित झाला आहे. जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या सरोवरांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे नैसर्गिक सरोवर म्हणून लोणारचे सरोवर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. तसेच हे सरोवर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.
लोणार सरोवराचा व्यास सुमारे १६०० मीटर असून खोली १५० मीटर आहे व याचा परीघ सूमारे ७ कि. मी. आहे. असे मानले जाते की जी उल्का पडली तिचे वजन दोन लाख टन होते तर लांबी ६० मीटर होती. ही उल्का तीन तुकड्यांत विभागली गेली ज्यामुळे तीन वेगवेगळी सरोवरे निर्माण झाली. त्यांतील गणेश सरोवर व अंबर सरोवर ही सरोवरे आता कोरडी पडली आहेत. सन १८२३ मध्ये ब्रिटिश ऑफिसर सी.जे.इ. अलेक्झांडर याने हे सरोवर प्रथम शोधून काढले. सरोवरातील पाणी पिण्याच्या पाण्यापेक्षा दहापट अधिक खारट आहे. या पाण्यात सोडियम क्लोराइड, कार्बोनेट, बायकार्बोनेट यांसारखे पदार्थ सापडतात. परंतु हे पाणी वाहून जात नसल्याने ही खनिजद्रव्ये एका जागी एकत्रित होतात. काही वर्षांपूर्वी सरोवरातील पाण्याचे बाष्पीभवन झाल्यावर, येथील गावकर्यांना हे पदार्थ स्फटिकरूपात बघायला मिळाले. अशा परिस्थितीत येथे कोणत्याही प्रकारची जैवसृष्टी आढळणे म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट होय परंतु तरीही येथे काही प्रकारचे जीवाणू व शेवाळे आढळते. या पाण्यामुळे बरेच त्वचारोग बरे होतात असे मानले जाते. अकबराच्या काळात येथे मीठाचा कारखाना होता.
पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरास लोणार नाव मिळाले.या परिसरातील विष्णू मंदिर व इतर मंदिरे हेमाडपंतीय शैलीमध्ये बांधली आहेत. येथील गोमुख मंदिर प्रेक्षणीय आहे. परिसरात १४ मंदिरे असून ती विविध राजवटीत बांधली गेली आहेत. सर्वांत जुने मंदिर १३०० वर्षे जुने आहे. एका मंदिरात लोणार सरोवर कसे तयार झाले याविषयीच्या मूर्ती पाहायला मिळतात..

No comments:

Post a Comment