Saturday, 27 August 2016

sadashiv bhau peshwa

भाऊसाहेबांनी उद्गिरावर निजामाला लोळवून जो अपुर्व विजय मिळवला, तेथेच नानासाहेबांच्या व एकंदर पेशवाईच्या वैभवाची परिसमाप्ती होते. यानंतर ही गाडी पुढे अवघ्या दहा महिन्यांतच पानिपतच्या जबरधक्क्याने तोंड फिरवून अपकर्षाकडे धावत सुटते. शके १६८१ च्या फाल्गुनात उद्गिर संपले व शके १६८३ च्या ज्येष्ठांत नानासाहेबांनी सर्व प्रकारची वाताहात झालेली पाहता पाहता देह ठेविला. 
या तेरा चौदा महिन्यांत राज्याची सर्वच अंगे झडत जाऊन पेशवाई केवळ लुळीपांगळी झाल्याचा देखावा दिसत होता. पैसा गेला, प्रदेश गेला, कर्ती माणसे क्षय पावली, पानपतावर पेशव्यांचा खजिना रीता होऊन त्यावर कित्येक लाखांचा कर्जाचा बोजा चढल्यामूळे या अंगाकडे पाहण्याची तर सोयच उरली नव्हती. पानपतानंतर तर जबर व्याज देऊनही कर्ज मिळण्याची आशा उरली नव्हती. ही झाली कोशाची स्थिती. दुसरे अंग मनुष्यबळ. तेथे तर याहुनही हृदयद्रावक देखावा दिसत होता. राव-आप्पांनंतर ज्याने आपल्या कर्तृत्वाचे जोरावर पेशवाईचा गाडा पाच-सहा वर्षे पेशवाईचा गाडा चाकोरी न सोडता व्यवस्थित चालवून वाहवा मिळविली होती त्या महादोबा पुरंदर्यांच्या मृत्युपासून (शके १६८२ कार्तिक) मनुष्यहानीला जी एकंदर सुरुवात झाली तिने नानासाहेबांचा बळी घेऊन दुर्दैवाची कमालच करून टाकली. भाऊसाहेब, विश्वासराव, जनकोजी शिंदे वगैरे मोहरे व कमावलेले सैनिक यांचा पानिपतावर झालेला संहार यासारखा न भुतो न भविष्यती मृत्यूच्या अजय तडाख्याला इतिहासात तोडच मिळावयाची नाही. पानपतावर मराठ्यांची जवळजवळ एक पिढीच्या पिढीच कापली गेल्यामूळे महाराष्ट्रभर जो हाहाःकार उडाला त्याचे वर्णन करण्याची सोयच नव्हती. अशा या आपत्काली अंतःस्थ आणि बहिःस्थ शत्रूंनी उचल न खाल्ली तर ते राजकारण कसले ? पानपतात पेशव्यांच्या विरुद्ध पक्षास सामिल झालेल्या व तरत्या-बुडत्याची वाट पाहत बसल्यामूळे सुरक्षित राहिलेल्या शत्रूंनी या नाजूक प्रसंगाचा पुरेपूर फायदा घेऊन उत्तरेत मराठ्यांची सत्ता केवळ नाममात्र ठेवून अराजकाला ऊत आणला. हाच देखावा दक्षिणेतही दिसत होता. निजाम हा मराठ्यांचा पिढ्यानपिढ्यांचा हाडवैरी असून त्याच्या जोडीला आता श्रीरंगपट्टणचे राज्य घशात टाकून शेर बनलेला हैदरनाईक येऊन मिळाला होता. उद्गिरला स्वसामर्थ्याला धक्का न लागू देता झालेली अंतस्थ व्यवस्था दूर करण्यास अवसर मिळावा म्हणूनच निजामाने पेशवे म्हणतील त्या अटीवर उद्गिरवर तह करून वेळ मारून नेली होती. पेशव्यांचे लक्ष पानिपतावर होतेच परंतू इकडे निजामाच्या छाताडवर राघोबा आणि हैदरच्या छाताडावर विसाजीपंत बिनीवाले नसता तर निजाम-हैदर या जोडिने संगनमत करून दक्षिणेतही पानपतचा देखावा दाखविण्यास कमी केले नसते. अशा वेळेस नानासाहेबांच्या मृत्यूनंतर, आणि त्यांच्या पुढे गादी चालवण्याचा वसा सांगणार्या विश्वासरावांच्या मृत्यूनंतर कारभारी आबा पुरंदरे, सखारामबापू बोकील आणि राघोबादादाच्या पाठिंब्याने गादीवर आले ते नानासाहेबांचे द्वितिय चिरंजीव श्रीमंत माधवराव बल्लाळ

bajirao peshwa part 4

श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांचा २८ एप्रिल १७४० रोजी नर्मदेच्या काठी रावेर येथील वाड्यात मृत्यू झाला. मराठ्यांचा हा "ईश्वरदत्त सेनानी" आणि महान पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेला. बाजीरावसाहेबांच्या वीस वर्षांच्या आयुष्यात त्यांचे जिवन किती धकाधकीचे गेले याबद्दल पुढील त्यांच्या मुक्कामांवरून अंदाज येईल.
सन १७२० :
एप्रिल ते जून : वर्हाड, खानदेश
जुलै : बाळापूर
ऑगस्ट : पुणे
सप्टेंबर : सासवड, पुणे
ऑक्टोबर : बारामती
नोव्हेंबर : सातारा
डिसेंबर : मोंगलाई (गोदावरीपलीकडील प्रदेशात धावणी)
सन १७२१ :
जानेवारी : सावर्डिया
फेब्रुवारी ते ऑगस्ट : विजापूर
सप्टेंबर, ऑक्टोबर : सातारा
नोव्हेंबर : पिंपरी, पुरंदर
डिसेंबर : जुन्नर
सन १७२२ :
जानेवारी : जुन्नर
फेब्रुवारी ते मे : कुरकुंभ, सुपे
जुलै ते सप्टेंबर : सातारा
ऑक्टोबर : सासवड, सुपे
डिसेंबर : मोंगलाई
सन १७२३ :
जानेवारी : बर्हाणपूर, हांडे
फेब्रुवारी : बदकशा, झावाब
मार्च : बोरगाव, अशेरी
एप्रिल ते जुन : बुंदेलखंड
जुलै ते ऑक्टोबर : सातारा
नोव्हेंबर : वाई, महाबळेश्वर, प्रतापगड, सातारा
डिसेंबर : माळवा
सन १७२४ :
जानेवारी ते जुलै : उज्जैन, बुंदेलखंड
जुलै-ऑगस्ट : सातारा
सप्टेंबर-ऑक्टोबर : मोंगलाई, साखरखेडले
नोव्हेंबर-डिसेंबर : बर्हाणपूर, माळवा
सन १७२५ :
जानेवारी ते मार्च : माळवा
एप्रिल ते ऑगस्ट : सातारा, माहुली, पुणे
सप्टेंबर ते डिसेंबर : गदग, चित्रदूर्ग इत्यादी
सन १७२६ :
जानेवारी-फेब्रुवारी : बेटावद
फेब्रुवारी ते मे : श्रीरंगपट्टणम्, त्रिचनापल्ली, अर्काट
जून ते सप्टेंबर : सातारा, पुणे
सप्टेंबर ते डिसेंबर : पंढरपूर, विजापूर
सन १७२७ :
जानेवारी ते जुलै : मोंगलाई
जुलै - ऑगस्ट : सातारा
ऑगस्ट ते डिसेंबर : औरंगाबाद, खानदेश, गुजरात
सन १७२८ :
जानेवारी : धुळे
फेब्रुवारी : पालखेड
मार्च : मुंगी पैठण
एप्रिल ते जुन : पुणे
जुलै ते सप्टेंबर : सातारा
ऑक्टोबर ते डिसेंबर : तुळजापूर, खानदेश
सन १७२९ :
जानेवारी-फेब्रुवारी : खानदेश, नेमाड, बर्हाणपूर
मार्च ते जुलै : माळवा, जैतपूर
जुलै ते डिसेंबर : सातारा, सुपे, फलटण, पुणे
सन १७३० :
जानेवारी : पुणे
फेब्रुवारी ते जुलै : उंबरज
जुलै ते ऑक्टोबर : उंबरज, सातारा, पुणे
ऑक्टोबर ते डिसेंबर : खानदेश
सन १७३१ :
जानेवारी ते मार्च : गुजरात, डभई
एप्रिल-मे : सातारा
जुन ते डिसेंबर : सातारा, पुणे
सन १७३२ :
जानेवारी ते मार्च : अलिबाग
मार्च ते जुलै : माळवा
ऑगस्ट ते ऑक्टोबर : सातारा
नोव्हेंबर - डिसेंबर : मोंगलाई
सन १७३३ :
जानेवारी ते मार्च : मोंगलाई, निजाम भेट
मार्च ते डिसेंबर : अलिबाग, जंजिरा
सन १७३४ :
जानेवारी ते जुलै : माळवा, दिल्ली, आग्रा
जुलै ते डिसेंबर : सातारा, पुणे
सन १७३५ :
जानेवारी : पुणे
फेब्रुवारी ते जुन : जंजिरा, गोवळकोट
जुलै ते ऑक्टोबर : सातारा, पुणे
नोव्हेंबर - डिसेंबर : खानदेश, माळवा
सन १७३६ :
जानेवारी ते जुलै : अजमेर, पुष्कर
ऑगस्ट ते ऑक्टोबर : सातारा, पुणे
नोव्हेंबर - डिसेंबर : खानदेश, माळवा
सन १७३७ :
जानेवारी ते जुलै : भेलशाची स्वारी
जुलै ते सप्टेंबर : सातारा, पुणे
ऑक्टोबर ते डिसेंबर : खानदेश, माळवा
सन १७३८ :
जानेवारी ते जुलै : भोपाळची स्वारी
जुलै ते सप्टेंबर : सातारा, पुणे
ऑक्टोबर ते डिसेंबर : उत्तर कोकण
सन १७३९ :
जानेवारी ते मार्च : ठाणे, वसई, तारापूर
एप्रिल ते जुलै : खानदेश, वर्हाड
जुलै तए ऑक्टोबर : सातारा, पुणे
नोव्हेंबर ते डिसेंबर : खानदेश
सन १७४० :
जानेवारी ते एप्रिल खानदेश
२८ एप्रिल - मृत्यू
निरंजन माधव एकबोटे नावाचा बाजीरावांच्या समकालीन कवी त्यांच्याबद्दल लिहीतो- "शाहू भूपतीचा प्रधान । बाजीराव बल्लाळ पृथ्वीरत्न । परम यशस्वी पावन गुण । भूपाळ मंडळी शिरोमणी ॥".

Malharrao Holkar



मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली. शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली.
भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. जेजुरीचा खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची मल्हाररावांची धारणा होती, त्यामुळेच त्यांनी सुभेदारी मिळाल्याबरोबर जेजुरीला कुलोपाध्ये नेमले. मंदिराचे बांधकाम करण्याचा घाट घातला.
उत्तरोत्तर मल्हाररावांची प्रगती होत होती, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते. गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा झाला होता. इसवी सन १७३३ मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला. १७ मार्च १७५४मध्ये कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी खंडेराव छावणीतून बाहेर पडले आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण प्राप्त झाले. अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हाररावांना तिचा विचार बदलण्यात यश आले, परंतु बाकी अकराजणी सती गेल्या. पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हाररावांनी मोहिमा उघडल्या. इसवी सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. यात त्यांना मल्हाररावांनी मदत केली.
पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या. पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या.

Mahadji Shinde

महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, बाजीराव यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जात. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.
महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या निजामा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये बेळूर च्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.
१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपुर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिररीचा सहभाग होता.
मल्हाराव होळकरांच्या साथीत शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्ते खाली होते ते मराठा अख्यारीत आणून व येथील काही हिंदू मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला व मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र म्हणून शिंद्यांचा अधिपत्याखाली तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाहलेर येथे शिंद्यांचे केंद्र म्हणून बनवले.

Ibrahim khan gardi

इब्राहिम खान गारदी (?? - इ.स. १७६१:पानिपत, हरयाणा, भारत) पानिपतच्या तिसर्‍या लढाईमधील मराठ्यांचा प्रमुख सरदार होता.
याच्याकडे १०,००० पायदळ व तोफखान्यातील सैनिकांचे नेतृत्त्व होते.
इब्राहिम खान गारदी हा हैदराबादच्या निजामाच्या सेवेत होता. तुकडीचे नेतृत्व असल्याने त्याने खान या नावाची पदवी धारण केली होती. मराठ्यांनी त्याची उपयुक्तता पाहून आपल्या बाजूला वळवले. पानिपतच्या तिसर्‍या लढाईत इब्राहिम खान गारदीने गारद्यांच्या तुकडीचे नेतृत्व केले. ह्या तुकडीने फ्रेंच सैन्याकडून प्रशिक्षण व हत्यारे घेतली होती. १७५० च्या दशकात मराठा सैन्याचे अतिशय प्रबळ सैन्यात रुपांतर होण्यात या तुकडीचा मोठा वाटा होता. हे सैनिक त्यांच्या प्रशिक्षण व हत्यारांमुळे युरोपीय सैन्यासाठी देशी मस्केटीयर्स होते. गारद्यांची हल्ला पद्दती ही ब्रिटीश अथवा फ्रेंच सैनिकांप्रमाणे होती. पुढे जाणाऱ्या पायदळामागून धडाडणाऱ्या तोफांचे संरक्षण मिळे. जेव्हा पायदळ सेना शत्रूजवळ पोहोचे तेव्हा तोफा थांबून पायदळ बंदूकीने हल्ला करत. जेव्हा समोरची फौज एकदम जवळ येई त्यावेळेस तलवार, भाला या पारंपारिक शस्त्रांनी शत्रूवर हल्ला चढवण्यात येई.
पानिपच्या तिसऱ्या लढाईत इब्राहीमखानच्या गारदी तुकडीने आपल्या बरकंदाज व शिलेदारांसह शेवटपर्यंत जहाल हल्ले चालू ठेवले. मुख्य सैन्याने पळ काढल्यावरही गारद्यांनी अफगाण्यांशी झुंज चालू ठेवली. एक एक करीत हे गारदी पडले व सकाळपर्यंत पूर्ण तुकडी नेस्तनाबूद झाली. उरल्यासुरल्या मोजक्या शिपायांनी पहाटेच्या अंधारात माघार घेतली. इब्राहीमखानला अफगाणी सैन्याने जिवंत पकडले व हालहाल करून ठार मारले. मराठा सरदारांपैकी अनेकांनी या लढाईत माघार पत्करुन पुणे गाठले पण इब्राहीमखानने आपल्या देशासाठी जीव दिला.

Balaji Peshwa 2

२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. ही बातमी मिळताच माळव्याच्या सुभेदारीवर असलेल्या त्याचा मुलगा - आज्जमशहा त्वरेने अहमदनगरला आला. ईदच्या मुहूर्तावर १४ मार्च १७०७ रोजी त्याने स्वतःला बादशहा म्हणून जाहीर केले. व आपला भाऊ शहा आलमचा काटा काढायला तो उत्तरेत निघाला. याच वेळी झुल्फिकारखान व इतरांच्या सल्ल्याने त्याने ८ मे १७०७ रोजी शाहूंची सुटका केली. मात्र येसूबाईंना त्याने कैदेतच ठेवले. ऑगस्ट १७०७ मध्ये शाहू महाराष्ट्रात आले. ताराराणींनी सात वर्षे औरंगजेबाशी लढा देऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले होते, शाहूने गादीवर आपला हक्क सांगताच संघर्ष होणार हे अटळ झाले. शाहूने सुरुवातीला समजूतदारपणे घेतले मात्र ताराराणींनी लढाईची तयारी करताच शाहूंचा नाइलाज झाला. धनाजी जाधव व परशुराम त्रिंबक सैन्य घेऊन निघाले. शाहूंनी धनाजीस बोलणी करावयास बोलावून घेतले. धनाजी जाधवांच्या पदरी असलेल्या खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ आनि नारो राम यांनी शाहूंचा पक्ष बरोबर असून त्यांचा पक्ष घेण्याची गळ धनाजीरावांना घातली. धनाजी ससैन्य शाहूंच्या बाजूने गेले. परशुराम त्रिंबकाने याला विरोध केला मात्र अखेर खेड येथील लढाईत शाहूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. शाहूंनी धनाजीरावांना सेनापतीपद, नारो शंकरांना सचिवपद व बाळाजी विश्वनाथास मुतालिक म्हणून नेमले आणि सेनाकर्ते असा किताबही दिला.
अर्थातच स्वराज्याच्या २ गाद्या तयार झाल्या. ताराराणींच्या पक्षातले अनेक जण बाळाजीने केवळ स्वतःच्या शब्दावर शाहू महाराजांच्या पक्षात आणले. राज्यकारभार चालवताना तुटलेली माणसे त्यांनी परत जोडली. जर शाहूंचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी सहज झुंजू शकतील हे आंग्‍ऱ्यांना बाळाजीनेच पटवून त्यांना शाहूंच्या पक्षात आणले. त्यांनी सय्यदबंधूंबरोबर तह घडवून आणला, मग त्यांच्याच साहाय्याने दिल्लीच्या फर्रुखसियर बादशहाला पदच्युत करून रफिउद्दौरजात याला गादीवर बसवले. याच तहानुसार बाळाजींनी शाहूच्या पत्नींची सुटका करवून घेतली. मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उडू नये म्हणून बाळाजीने केलेली राजकारणे भल्याभल्यांची मती गुंग करणारी आहेत. आणि हे केवळ त्याने शब्दसामर्थ्यावर घडवून आणले होते हे महत्त्वाचे. १७०७पासून पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले. अर्थात तो त्या योग्यतेचा होताच, आणि ते पद त्याने सहजगत्या पेलले.
बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर पेशवेपद त्यांचे पुत्र बाजीरावाकडे आले.

Panipat War 2

परदेशी इतिहासकार पानिपतावरील मराठा पराक्रमाचे गोडवे गात असताना दुर्दैवाने काही भारतीय लेखक आणि इतिहासकार पानिपत हे मराठे आणि महाराष्ट्रावरील कलंक आणि अपयश असल्याचे मानतात. वास्तविक पाहता दिल्लीत मुसलमानी राजवट असताना शेकडो मैल दूर असलेल्या पुण्यावरून मराठा लष्कराला पानिपतावर जाण्याची मुळीच गरज नव्हती. खरे तर दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी मुघलांची हुजरेगिरी, गुलामगिरी करणारे, त्यांच्या बाजूने लढणारे तत्कालीन राजपूत, जाट, मुस्लिम संस्थानिक, राजेरजवाड्यांची होती. दिल्लीच्या इभ्रतीचे रक्षण करण्यासाठी आलेल्या मराठ्यांना मदत न करता बिळात लपून बसणाऱ्या वर उल्लेखित सर्वांसाठी पानिपत हे कलंक आहे. या भूमीचे अन्न खाल्लेला, तिच्यावर पोसला गेलेला रोहिलखंडचा नजीब खान, अवधचा नबाब शुजाउद्दोला यांनी मराठ्यांच्या राष्ट्रधर्माची बाजू न घेता आपल्या धर्माची तळी उचलून धरत देशाशी बेइमानी केली. त्यामुळे पानिपतचा कलंक हा मराठ्यांवर नव्हे, तर या सर्व बेइमानांवर आहे. पानिपतावर मराठे प्राणाची आहुती देत असताना महाराष्ट्र वगळता उर्वरित हिंदुस्थानातील तथाकथित ‘पराक्रमी’ राजे-महाराजे, संस्थानिक गंमत पाहत होते. धर्माने मुसलमान असलेल्या दिल्लीच्या बादशहाचे राज्य शाबूत ठेवण्यासाठी लाखभर मराठ्यांनी मैदानावर जिवाची जी होळी खेळली, त्याला देशाच्या इतिहासात तोड नाही.
अफगाणिस्तानचा शासक अहमदशहा अब्दाली, भारतातील बेइमान नजीबखान रोहिला आणि अवधचा नबाब शुजाउद्दोला यांनी हे युद्ध धर्मासाठी लढले. परंतु, मराठ्यांनी देशासाठी युद्ध केले. कारण, मराठ्यांचे लष्कर हे अठरापगड जातींचे होते. त्यात मराठा, ब्राह्मण, मुस्लिम, हबशी यांच्यासह महाराष्ट्रातील बारा बलुतेदार शिपाई सहभागी झाले होते. भगवा झेंड्याच्या रक्षणासाठी मुस्लिम असलेल्या इब्राहिम खान गारद्याने धर्मासाठी नव्हे, तर राष्ट्रकार्यासाठी प्राणाचे बलिदान दिले. सदाशिवराव भाऊने तर पानिपतावर अभिमन्यूप्रमाणे लढताना अतुलनीय पराक्रम गाजविला. त्यांच्या शौर्याला तोड नाही. अनेक सरदार त्यांना रणांगण सोडण्याचे सल्ले देत असताना भाऊने देशकार्यासाठी मरण पत्करणे पसंत केले.

Panipat War 1


औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्‍याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्यार्‍या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमूर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले. अफगाण सेनानी अब्दालीने याला होकार दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे याची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले.

Bajiprabhu Deshpande


सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते.बाजीप्रभू हे बांदल यांचे सरदार होते.रायाजी बांदल[१],फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते[२]. त्या वेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. (ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे.) मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले.

panipat war



पानिपत येथे मराठ्यांस आलेले अपयश धुवून कढण्याची माधवरावास फार इच्छा होती. पण इ.स. १७६८ पर्यंत राज्यकारभाराची सूत्रे राघोबा याजकडे असल्यामुळे माधवरावास विशेष काही करिता आले नाही. तदनंतर राघोबास ठिकाणी बसविल्यावर रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांजबरोबर ५०,००० फौज देऊन माधवरावाने त्यांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली. तिकडे शिंदे, होळकरांचे सैन्य त्यास मिळाले.
मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडून राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यात पानिपत येथें मराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत.

shahu mahraj bhosle

छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत,माळवा,गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी राज्याच्या कोल्हापूर व सातारा अशा दोन स्वतंत्र छत्रपतींच्या गाद्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) निर्माण झाल्या. औरंगजेबाच्या अझमनामक मुलाने शाहूंची सुटका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले; मात्र चौथाई व सरदेशमुखीसाठी १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली. छत्रपती शाहू (कार. १७०८–४९) यांनी १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले. त्यांनी सातारा ही राजधानी केली. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्त केली. त्यांनी अनेक गुणी, कर्तृत्ववान व पराक्र मी माणसे निवडून राज्यविस्तार केला. या कामी त्यांना बाळाजी विश्वनाथ,पहिला बाजीराव व बाळाजी बाजीराव हे पेशवे आणि कान्होजी आंग्रे,रघूजी भोसले, दाभाडे, उदाजी चव्हाण यांसारखे कर्तबगार व निष्ठावान सरदार-सेवक लाभले.

narayanrao peshwa


डिसेंबर १७७२ मध्ये माधवरावांचे धाकटे बंधू नारायणराव हे पेशवे झाले. मात्र राघोबादादांच्या गारद्यांनी त्यांचा खून केला. आणि, १७७३ मध्ये राघोबादादा स्वतःच पेशवे झाले. नारायणरावांच्या मृत्यूची चौकशी करून न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी नारायणरावाच्या खूनाचा ठपका राघोबादादांवर ठेवला, राघोबांनी निमूटपणे पेशवेपदाचा राजीनामा देऊन नारायणरावाचा पुत्र माधवराव २रा म्हणजेच सवाई माधवराव यास गादीवर बसवले. १७९६ पर्यंत त्यांनी गादी चालवली. सवाई माधवरावांच्या काळात मराठ्यांनी परत दिल्लीवर जरब बसवली. खुद्द महादजी शिंदे दिल्लीत तळ ठोकून राहिले, बादशहाने त्यांना वजीर म्हणून नेमणूक करायचा प्रस्ताव दिला, पण अतिशय नम्रपणे महादजी शिंदे यांनी त्याला नकार देऊन ती वस्त्रे पुण्यास पाठवून पेशव्यांना वजीर नेमले. दिल्लीच्या नाड्या पुन: पुण्याच्या हातात आल्या याचेच हे पुरावे होते. इथे नाना फडणिसांनी इंग्रजांची २-३ राजकीय व लष्करी आक्रमणे परतवून लावली. यामुळे "जबतक नाना तबतक पुना" असे भारतभर म्हंटले जाऊ लागले.

bajirao peshwa part 3

बाळाजींच्या मृत्यूनंतर "पेशवेपदासाठी" दरबारी लोकांत अहमहिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले. त्याला २ कारणे होती - १)यादवकालीन राजकारणापासून ते ताराराणीपर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते. २)थोरला बाजीराव हा फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली.
बाजीराव शिपाई होता. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंबर,१७२३), धार (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपूर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (१७मे, इ.स. १७३९) या आणि अशाच ३६ मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा "सक्सेस रेट" "१००%" आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण "मैदानी लढाई" लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली. बर्नाड मॉन्टगोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटिश ’फील्डमार्शल’ने बाजीरावाची स्तुती पुढीलप्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. शनिवारवाड्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठिकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट किल्लाच बांधवून घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालून येणारे ’शिकारी कुत्रे’ खरेच स्वराज्याला घाबरू लागले.

bajirao peshwa

१७२७च्या शेवटी बाजीराव आपल्या सैन्यासह कर्नाटकातील मोहीमेवर होता. निझामाने महसूल देणे बंद करविल्यावर छत्रपती शाहूस निझामाला धडा शिकवण्याचा व त्यानिमित्ताने मराठा साम्राज्याचा पूर्वेस विस्तार करण्याचा सल्ला बाजीरावाने दिला. छत्रपतींनी बाजीरावास सैन्यासह आपल्याकडे बोलावून घेतले. इकडे कोल्हापूरातील श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांनी छत्रपती संभाजीला निझामाशी वाटाघाटी करण्याचे सुचवले. पावसाळा संपतासंपता बाजीरावाने सैन्यास कुमक लावून घेतली व औरंगाबादकडे कूच केले. जालन्याजवळ त्याने निझामाच्या सैन्यावर छापा घातला आणि शत्रू सावध होउन लढायला तयार होईपर्यंत मराठा सैन्याने उत्तरेस बुऱ्हाणपुराकडे वाट काढली.
निझामाचा सरदार इवाझ खान याने बाजीरावाचा पाठलाग सुरू केला. बाजीराव खानदेशातून गुजरातकडे निघाला. बाजीराव आपल्याला पतंगाप्रमाणे ओढीत नेत असल्याचे लक्षात येउन निझामाच्या सैन्याने त्याचा नाद सोडला व बाजीरावास शह देण्यासाठी त्याने पुण्यावरच चाल केली. आपल्या राजधानीकडे शत्रू जात असल्याचे पाहून बाजीराव आपसूकच आपल्या जाळ्यात येईल असा निझामाचा डाव होता. निझामाने दक्षिणेकडे सरकत उदापूर, अवसरी, पाबळ, खेड, नारायणगाव जिंकले. त्यानंतर खुद्द पुण्यात घुसून तेथे तळ ठोकला आणि तेथून साताऱ्यावर चाल केली. आतातर त्याने सुपे, पाटस आणि बारामती पर्यंत धडक मारली आणि साताऱ्यातील छत्रपतींना धोका निर्माण केला.
असा शह बसल्यावर छत्रपती, बाजीराव किंवा दोघेही नाक मुठीत धरून आपल्यास शरण येतील असा निझामाचा हा डाव पूर्ण होत आला होता. बाजीरावाने त्यास भीक न घालता निझामासच काटशह देण्याचे ठरवले व खुद्द निझामाची राजधानी असलेल्या औरंगाबादवर चाल केली. निझामास ही खेळी अनपेक्षित होती. त्याला औरंगाबादचा बचाव करणे भाग होते पण हाताशी आलेला मराठा छत्रपती सोडणेही त्याच्या जीवावर आले होते. त्याने आता कोल्हापूरच्या छत्रपतींना साताऱ्यावर चाल करण्यास सुचवले. काट्याने काटा काढण्याची ही निझामाची हिकमत नामी होती. छत्रपती संभाजीला आपली सत्ता प्रबळ करणे ही लालूच दाखवून कोल्हापूरला आपले धार्जिणे राज्य करून घेणे निझामाला अपेक्षित होत. परंतु येथेही त्याचा अंदाज चुकला. संभाजी व पंतप्रतिनिधी यांनी छत्रपती शाहूवर हल्ला करण्यास नकार दिला. आता बाजीरावाच्या कचाट्यातून औरंगाबाद तरी वाचवावे यासाठी निझाम पुणे-सातारा परिसर सोडून उत्तरेस निघाला. बाजीरावाने औरंगाबादचा रस्ता सोडून निझामाला वाटेतच पकडण्याचा व्यूह रचला. औरंगाबादकडे निघालेल्या निझामाच्या सैन्यावर विद्युतवेगी हल्ले चढवत बाजीरावाने त्यास सळो कि पळो करुन सोडले. छापा घालून चकमकींचे लढाईत पर्यवसान होण्याआधी आपल्याला अनुकूल अशा दिशेस पळ काढत बाजीरावाने निझामास नाशिककडे ओढत नेले. असे करता फेब्रुवारी २५, इ.स. १७२८ रोजी पालखेड जवळील निपाणी प्रदेशात निझामाचे सैन्य आणि गोदावरी नदी यांच्यामध्ये ठाण मांडून बाजीरावाने निझामाला कोंडीत धरले. शेवटी फेब्रुवारी २८ रोजी निझामाने मराठ्यांची फळी फोडत गोदावरीपर्यंत पोचण्याचा आपल्या सैन्यास हुकुम दिला. जेरीस आलेल्या निझामी सैन्याने लढण्यास साफ नकार दिला. निझामाने इवाझ खानामार्फत बाजीरावास शरणागतीचा संदेश पाठवला व फारशी खानाखराबी न होता मराठ्यांनी निझामाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला.

Chimaji appa Peshwa


फेब्रुवारी १७, इ.स. १७३९ रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. अत्यंत चिकाटीने चालवलेल्या वेढ्यासोबतच त्यांनी किल्ल्यावर गनिमी काव्याने हल्ले चालू ठेवले. अशाच एका हल्ल्यात पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मृत्युमुखी पडला. तरीही पोर्तुगीजांनी हिमतीने लढा चालू ठेवला आणि चालून येणाऱ्या मराठ्यांच्या लाटांचा हातबाँब, बंदुका आणि उखळी तोफा वापरून प्रतिकार चालू ठेवला. आपल्या वरचढ तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांचे बरेच नुकसान केले; परंतु मराठ्यांनी आपला वेढा सैल होऊ दिला नाही. इकडे आंग्र्यांच्या आरमाराने समुद्री मार्गही बंद केलेले होते आणि तेथूनही रसद मिळणे बंद केले होते.
शेवटी मे १६, इ.स. १७३९ रोजी वेढा धसास लागला आणि मराठ्यांनी किल्ल्यावर एल्गार केला. चिमाजी अप्पाने स्वतः पहिली तोफ डागली आणि नारो शंकर दाणी याच्या नेतृत्वाखालील घोडदळ आणि आंग्र्यांचे आरमार दोहो बाजूंनी पोर्तुगीजांवर तुटून पडले. तोफखान्याच्या सरदार गिरमाजी कानिटकराने किल्ला पुरता भाजून काढला आणि मानाजी आंग्र्याच्या बरकंदाजांनी गुराबांवरुन पोर्तुगीज शिपाई टिपून काढणे सुरू ठेवले. या भडिमारापुढे पोर्तुगीज बचावाने नांगी टाकली आणि त्यांनी मराठ्यांकडे शरणागती मागितली. शरण आले असताही आपल्या सैन्यास मानानिशी वाट काढून द्यावी आणि त्यांना अभय द्यावे, अशी विनंती त्यांनी चिमाजी अप्पाकडे केली. मराठ्यांनी ही विनंती मंजूर केली आणि शरण आलेल्या सैन्याला त्यांनी वाट करून दिली.

Madhawrao Peshwa

इ.स. १७६० मध्ये म्हैसूरचा नामधारी राजा चिक्ककृष्णराज मरण पावला. त्याच्या जागी हैदरने त्याचा वडील मुलगा नंदराज यास गादीवर बसविले. परंतु पुढे नंदराज स्वतंत्र होण्याची खटपट करीत आह, असे पाहून हैदरने त्यास बंदीखान्यात टाकले व त्याची मालमत्ता आपणाकडे घेतली. या वर्तनाचा माधवराव पेशव्यांस राग येऊन, त्यांनी निजामांशी दोस्ती करून हैदरवर स्वारी केली. तेव्हा हैदरने मुलूख उजाड करून तलाव फोडून व विहिरीत विष टाकून मराठ्यांस अटकाव करण्याची शिकस्त केली. परंतु मराठे पुढे येऊ लागल्यामुळे निरुपाय होऊन त्याने अप्पाजीराव नावाचा वकील तह करण्याकरिता मराठ्यांकडे पाठविला. त्याने पेशव्यांस २६ लक्ष रुपये लढाईचा खर्च म्हणून् व १४ लक्ष दरसाल खंडणी म्हणून देण्याचे कबूल केल्यावरून पेशव्यांनी हैदरशी तह केला.

Balajirao Peshwa

बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेचमराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले. शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वतः मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले. इ.स. १७४९ साली शाहू छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर बाळाजी मराठा राज्याचा सर्वसत्ताधीश झाला. शाहूचा वारस रामराजा हा सातारा येथे नामधारी छत्रपती म्हणून छत्रपतीच्या गादीवर होता तरीही बाळाजीने छत्रपतीच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला.त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात दिनांक २५ सप्टेंबर,इ.स. १७५० रोजी सांगोला येथे करार झाला. त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. बाळाजी बाजीरावाने छत्रपतींना दरसाल पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारान्वये ठरले.

Bajirao Peshwa

'श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान बाजीराव बल्लाळ पंतप्रधान' ही मुद्रा धारण करणाऱ्या बाजीरावांकडे कोणतेही छक्केपंजे नव्हते. ब्राह्मणांचा त्या काळातील कर्मठपणाही नव्हता. नेपोलियनने जसे सामान्यातून मार्शल निर्माण केले तसे बाजीरावांनी अठरापगड जाती-जमातीतून लढवय्यै सरदार निर्माण केले. संबंध भारतभूमीत स्फुल्लिंग पेटवला, अस्मिता निर्माण केली. अस्थिर झालेल्या स्वराज्याला त्यांनी स्थिर केले. एवढेच नाही तर ्संभाव्य विस्ताराचा मार्ग आखून दिला. हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. एवढा बळकट शनिवारवाडा बांधून ते त्यात कधीही विश्रांतीसाठी थांबले नाहीत. खऱ्या अर्थाने ते कर्तबगार, खऱ्या अर्थाने थोरले, खऱ्या अर्थाने ते श्रीमंत होते.

Balaji Vishvanath Deshmukh

बाळाजी विश्वनाथ (भट) देशमुख ( इ.स. १६६० – एप्रिल २, १७२०), किंवा पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते.
महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष. भट घराण्याकडे दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन या परगण्यांची देशमुखी वंशपरंपरेने चालत आली होती. ही देशमुखी शके १४००पासून शके १६०० पर्यंत अव्याहत चालू होती असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात, तर रियासतकार ही देशमुखी १४७८ च्या सुमारास मिळाली असावी असे मानतात. तसेच बाळाजी विश्वनाथाचे वडील व आजोबा शिवाजीच्या सेवेत असावेत असेही रियासतकार म्हणातात. १५७५ च्या सुमारास महादजीकडे ही परंपरागत देशमुखी होती. महादजीस, नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजीस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हा बाळाजीचा पिता. बाळाजीला ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी.
देशमुखीचे घराणे असल्याने बाळाजीस मोडी वाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांचे शिक्षण मिळाले. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ हिच्याशीर त्यांचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास म्हणाजे संभाजीच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली, त्यामुळे बाळाजीला श्रीवर्धन सोडावे लागले. त्यातच भट घराणे आंग्‍ऱ्यांना सामील आहे या संशयाने सिद्देने भट घराण्याचा छळ चालू केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालून समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबाबरोबर साताऱ्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरू केल्यावर मुरूड येथील "वैशंपायन" कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. पुढे याची आठवण ठेवून एका "वैशंपायन" गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले. शिवाय एक वैशंपायन १२०० स्वारांचे सरदार होऊन मध्यप्रदेशात ’सागर’ प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो.

Nana Fadanavis

नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म फेब्रुवारी १२, इ.स. १७४२ रोजी सातारा येथे झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रूळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात मार्च १३, इ.स. १८०० रोजी त्यांचा अंत झाला. वाई येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे.